धारदार शस्त्राने डोक्यावर वार; जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
हॉटेल भंडाराजवळ टोळक्याचा हल्ला | “आमचा जीव गेल्यावरच पोलीस कारवाई करणार का?” – जखमी तरुणाचा सवाल |
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरत-नागपूर महामार्गावरील हॉटेल भंडारा परिसरात झालेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्यात आल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जखमी तरुणाने केली आहे.
मित्रांसोबत जेवण करून परतत असताना हल्ला
राहुल शेलार (वय ३०, रा. श्रीराम नगर, चितोड रोड, धुळे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेलार हे मध्यरात्री मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करून घराकडे परतत होते. त्यावेळी काही युवकांनी त्यांना अडवून “तू सुमित शिंदे आणि त्यांच्या मित्रांमध्ये का राहतो?” असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. यानंतर चार ते पाच जणांच्या टोळक्याने राहुल शेलार यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
मित्रांनी पळ काढल्याने बचाव
हल्ल्यावेळी राहुल शेलार यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र राहुल शेलार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निलेश देवरे आणि शुभम साळे यांच्यावर आरोप
हा हल्ला निलेश देवरे, शुभम साळे यांच्यासह इतरांनी केल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे. “आमचा जीव गेल्यावरच पोलीस प्रशासन जागे होणार आहे का?” असा संतप्त सवाल राहुल शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान, शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
