मे महिन्यात कपाशी लागवडीला वेग; ट्रॅक्टर डिझेलटंचाईमुळे शेतकरी हैराण
मान्सूनपूर्व शेतीकामांना वेग | कपूस, मका, सोयाबीन लागवडीची तयारी | डिझेलअभावी मशागत आणि पेरणीवर परिणाम
धरणगाव : मान्सूनच्या पूर्वसंध्येला धरणगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून शेतकरी सध्या मशागत, पेरणी आणि खत व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त झाले आहेत. विशेषतः मे महिन्यात कपाशी लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाल्याने ग्रामीण भागात शेतीकामांची लगबग वाढली आहे.
यंदा तालुक्यात कपूस, मका, सोयाबीन आणि बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक साहित्याचा साठा करून तयारी सुरू केली आहे.
ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्रांना वाढती मागणी
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि पेरणी यंत्रांची मागणी वाढली आहे. शेतकरी वेळेत मशागत पूर्ण करण्यासाठी शेतात दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. मे महिन्यातच पूर्वमशागतीची कामे पूर्ण करून मान्सूनच्या सुरुवातीलाच पेरणी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे.
डिझेलटंचाईमुळे शेतकरी अडचणीत
मात्र, शेतीकामांच्या या धावपळीत ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलची टंचाई शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पेट्रोलपंपांवर वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने मशागत आणि पेरणीची कामे रखडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
“पेरणीची वेळ सुरू झाली आहे, पण ट्रॅक्टरला डिझेलच मिळत नाही. पंपावर तासन्तास थांबूनही डिझेल मिळत नसेल तर शेतीची कामे वेळेत कशी पूर्ण करायची?” अशी खंत धरणगाव परिसरातील शेतकरी राजू पाटील यांनी व्यक्त केली.
ग्रामीण रोजगारालाही चालना
खरीप हंगामाच्या तयारीमुळे ग्रामीण भागात मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मशागत, पेरणी आणि शेतातील इतर कामांमुळे गावागावात आर्थिक हालचाली वाढल्याचे चित्र आहे. मात्र, डिझेल टंचाईमुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह कमी होताना दिसत आहे.
प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करून पेट्रोलपंपांवरील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच डिझेल संकट निर्माण झाल्यास पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
