‘आपला दवाखाना’ आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
जळगाव (प्रशांत शिंदे) : १५ व्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून पगारापासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, प्रशासन आणि संबंधित एजन्सीविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुणे येथील श्री स्वामी सर्विसेस लेबर सिक्युरिटी एजन्सी मार्फत जळगाव जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळालेला नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (PF) रक्कम देखील वेळेवर खात्यात जमा करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अधिकृत पगार १५,५००; प्रत्यक्षात मिळतात फक्त ७ हजार
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शासनाच्या जीआरनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार ५०० रुपये वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र एजन्सीकडून फक्त ७ हजार रुपयेच देण्यात येतात. त्यातही पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
कर्मचाऱ्यांनी असा आरोपही केला आहे की, वारंवार मागणी करूनही एजन्सीकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. मार्च २०२६ पासून अनेक कर्मचाऱ्यांना कोणतीही लेखी सूचना न देता कामावरून थांबवण्यात आले असून, त्यामुळे अनेकांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांवरही संगनमताचे आरोप
कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत संबंधित अधिकारी आणि एजन्सी यांच्यात संगनमत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) आणि डीपीएम यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनाचा इशारा
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला असून, थकीत सहा महिन्यांचा पगार आणि PFची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आरोग्य सेवेशी संबंधित कर्मचारी आर्थिक विवंचनेत असताना आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
