सात नावांवरून तिढा कायम; मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका निर्णायक
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीवरून भारतीय जनता पार्टी मध्ये अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आल्यानंतर भाजपकडून सात नावांवर अंतिम निर्णय होत नसल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमधील विविध गटांकडून इच्छुकांची नावे पुढे करण्यात आल्याने पक्षांतर्गत मतभेद तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही कोणताही अंतिम तोडगा न निघाल्याची माहिती समोर आली आहे.
चार आमदारांची भूमिका चर्चेत
शहरातील भाजपचे चार आमदार आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदांवर संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्ष नेतृत्वाने जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नाव निश्चित करण्याचा अधिकार शहराबाहेरील वरिष्ठ नेते, मंत्री आणि खासदारांकडे सोपविण्यात आल्याची चर्चा असून, त्यामुळे स्थानिक आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही आमदारांना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शहराध्यक्षांची थेट तक्रार
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी काही आमदार पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार काम करत नसल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्ष अधिकच उफाळून आल्याचे चित्र आहे.
जुन्या कार्यकर्त्यांना संधी?
पक्ष नेतृत्वाकडून जुन्या आणि संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये महेश कुलकर्णी, राजू दुर्गे, अमोल थोरात, मधुकर बच्चे, कुणाल लांडगे, सचिन काळभोर, संजय मगोडीकर, नामदेव ठाके, शैलजा मोळक, भगवान मनसुख, तेजस्विनी दुर्गे आणि तेजस्विनी कदम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
मात्र या नावांवरूनही पक्षात मतभेद असल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महेश कुलकर्णी यांच्या नावाला विरोध दर्शवल्याची चर्चा आहे, तर महेश लांडगे यांनी सचिन काळभोर यांच्या नावाला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.
आरोप-प्रत्यारोपांमुळे पेच वाढला
दरम्यान, राजू दुर्गे यांच्या विरोधात भटकी कुत्री नसबंदी प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत, तर नामदेव ठाके हे निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांच्या नावावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली असून, पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरू आहे.
आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकी कोणती भूमिका घेतात आणि आगामी दीड महिन्यात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी कोणाच्या नावांवर शिक्कामोर्तब होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
