अदानी व्यवस्थापनासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप; “हक्कांवर गदा आणणारा करार मान्य नाही”
मोहने : गेल्या दोन दशकांपासून बंद असलेल्या एनआरसी कारखाना परिसरातील कामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नुकत्याच झालेल्या नवीन कराराला कामगारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अदानी समूहासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा करार कामगारविरोधी असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे.
एनआरसी कारखाना बंद झाल्यापासून हजारो कामगारांना त्यांच्या हक्काच्या देणी, थकबाकी आणि इतर लाभांसाठी न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. या प्रकरणी एनसीएलटी तसेच कामगार न्यायालयात कामगारांच्या न्यायहक्कांसाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन यांच्या माध्यमातून लढा सुरू आहे. हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीतील करारावरून वाद
कामगारांच्या थकीत देण्यांबाबत अदानी व्यवस्थापनासोबत नुकतीच मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या नवीन करारावर शुक्ला यांनी तीव्र आक्षेप घेतला. या करारामुळे कामगारांवर अन्याय होणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कराराला कडाडून विरोध दर्शवला. या घटनेनंतर कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित करारात कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस हमी देण्यात आलेली नाही. “इतकी वर्षे न्यायासाठी संघर्ष करूनही जर आमच्या हक्कांचे संरक्षण होत नसेल, तर असा करार आम्हाला मान्य नाही,” अशी भावना अनेक संतप्त कामगारांनी व्यक्त केली.
भूषण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास
दरम्यान, कामगार नेते भूषण सामंत यांच्या नेतृत्वावर कामगारांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे. अनेक संघटना आणि कामगार सामंत यांच्या युनियनच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
“कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून भूषण सामंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असे कामगारांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर बैठक आयोजित करण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार असल्याची माहिती अरविंद पाटील, अर्जुन पाटील, निलेश पाटील, वासुदेव पाटील, गौतम भंडारी, भगवान पाटील आणि अरुण पाटील यांनी दिली.
कामगार चळवळ तीव्र होण्याची शक्यता
नवीन कराराच्या मुद्द्यावरून एनआरसी परिसरात पुन्हा कामगार चळवळ पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासन आणि व्यवस्थापनाची भूमिका काय राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
