पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधीत भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ
पाळधी / धरणगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जीपीएस ग्रुप तसेच युवा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला.
“कलीयुगातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे,” असे मार्मिक प्रतिपादन ह.भ.प. रामेश्वर महाराज पाळधीकर यांनी आपल्या रसाळ आणि प्रभावी कीर्तनातून केले. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, जीवनाला योग्य दिशा मिळते आणि भगवंताशी नाते दृढ होते, असे सांगताना त्यांनी संत साहित्य, अभंग आणि संतवचनांच्या माध्यमातून नामभक्तीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या वाणीला उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. कीर्तनादरम्यान अनेक भाविक भावविव्हळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या सप्ताहासाठी उभारण्यात आलेला भव्य मंडप, आधुनिक ध्वनी व्यवस्था, आकर्षक व भव्यदिव्य व्यासपीठ तसेच भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सुखसोयी हे विशेष आकर्षण ठरत आहेत. एकावेळी तब्बल पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात अध्यात्म, संतविचार आणि भक्तीचा जागर अनुभवायला मिळत आहे.
या भक्तिमय सोहळ्यास ह.भ.प. ईश्वरलाल महाराज पाळधीकर, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प. गोपाल महाराज दोनगावकर, ह.भ.प. यज्ञेश महाराज आळंदीकर, ह.भ.प. मयूर महाराज तसेच ह.भ.प. परमेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामुळे पाळधीसह संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आगामी दिवसांतही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याचे चित्र आहे.
