सार्वजनिक ठिकाणी मद्यपान रोखण्यासाठी कडक पावले
मुक्ताईनगर : शहर आणि तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या उघड्यावरच्या मद्यपानाला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. याअंतर्गत मुक्ताईनगरमधील सर्व बार आणि वाईन शॉपधारकांना विशेष नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या दुकान परिसरात मद्यपान होणार नाही याची थेट जबाबदारी संबंधित व्यावसायिकांवर सोपविण्यात आली आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या नोटीसमध्ये बार व वाईन शॉप चालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी दुकानासमोर, रस्त्यावर, मोकळ्या जागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच दुकानासमोर किंवा परिसरात ग्राहकांना थांबण्यासाठी खुर्च्या, टेबल, पिण्याच्या पाण्याचे ग्लास, खाद्यपदार्थ अथवा मद्यपानास प्रोत्साहन मिळेल अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देऊ नयेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
प्रत्येक बार आणि वाईन शॉपच्या बाहेर “येथे मद्यपान करण्यास मनाई आहे” असा स्पष्ट फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय दुकानाबाहेर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणी मद्यपान करताना आढळल्यास संबंधित व्यक्तींना तत्काळ हटविणे आणि आवश्यक असल्यास पोलिसांना माहिती देणे, अशी जबाबदारीही दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे.
मुक्ताईनगर शहरातील काही भागांत सार्वजनिक ठिकाणी मद्यपानामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. विशेषतः सायंकाळच्या वेळेत काही ठिकाणी निर्माण होणारी गैरसोय आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे बारधारक आणि वाईन शॉप चालकांमध्ये हालचाल वाढली असून नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक शिस्त राखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाच्या प्रकारांवर कितपत नियंत्रण मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
