शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाला इशारा; शिरपूर फर्स्टचा न्यायासाठी संघर्ष कायम ठेवण्याचा निर्धार
शिरपूर (सुनील निकम) : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांतील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंघर्ष यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २३ मे ते २८ मे या कालावधीत पार पडलेल्या या यात्रेद्वारे तब्बल २१ गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या यात्रेचा शुभारंभ २३ मे रोजी खर्दे येथील दत्त मंदिरापासून झाला होता. तर २८ मे रोजी शिरपूर शहरातील बौद्धवाडा चौक येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. सहा दिवसांच्या या दौऱ्यात शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यात्रेदरम्यान गेल्या तीन वर्षांत शिरपूर फर्स्टने केलेल्या विविध आंदोलनांची, निवेदनांची आणि जनहिताच्या लढ्यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेले आंदोलन, रस्त्यांसाठी केलेला संघर्ष, शैक्षणिक सुविधा आणि विविध सामाजिक प्रश्नांवर केलेल्या प्रयत्नांचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला.
गावभेटीदरम्यान रेशन वितरणातील अडचणी, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांमधील त्रुटी आणि मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या. अनेक गावांमध्ये रस्ते, गटारी आणि इतर नागरी सुविधांची दुरवस्था असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधताना कापूस लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाय-१ (Y1) बियाण्यांच्या वाढीव किमतींचा मुद्दाही समोर आला. बाजारात हे बियाणे दुप्पट दराने विकले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र महिलांच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याच्या तक्रारीही विविध गावांतून पुढे आल्या. या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात व्यापक लढा उभारला जाईल, असेही शिरपूर फर्स्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यात्रेदरम्यान गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिरपूर फर्स्टच्या कार्याला पाठिंबा दर्शविला. जनसंघर्ष यात्रेचे संयोजक रवींद्र भील, सहसंयोजक चैतन्य जमादार व प्रणव भामरे, तसेच नियंत्रक रामेश्वर पावरा यांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानले.
“जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि न्यायासाठी लढा” ही भूमिका कायम ठेवत शिरपूर फर्स्ट भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन आणि निवेदनांच्या माध्यमातून सक्रिय राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
