मुस्लिम समाजातील सदस्याला महत्त्वाची जबाबदारी; माध्यमांसमोर संघटनेची भूमिका मांडणार
पुणे : सामाजिक कार्यकर्ते अली दारूवाला यांची पतित पवन संघटना, महाराष्ट्रच्या मुख्य प्रवक्ते तथा अधिकृत टीव्ही पॅनेलिस्टपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोपानराव देशमुख आणि प्रदेश सरचिटणीस नितीन सोनटक्के यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पतित पवन संघटना ही हिंदू समाजाचे हक्क, प्रतिष्ठा, अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. महाराष्ट्रातील हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात संघटना सक्रिय आहे.
मुख्य प्रवक्ते आणि अधिकृत टीव्ही पॅनेलिस्ट म्हणून अली दारूवाला हे मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल तसेच दूरदर्शन माध्यमांसमोर संघटनेची अधिकृत भूमिका मांडणार आहेत. विविध सामाजिक आणि सार्वजनिक विषयांवरील चर्चांमध्ये ते संघटनेचे प्रतिनिधित्व करतील.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना अली दारूवाला म्हणाले की, “मी सुन्नी मुस्लिम समाजातून येत असून, माझ्या माहितीनुसार पतित पवन संघटनेत ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या मुस्लिम समाजातील पहिल्या सदस्यांपैकी एक आहे. ही नियुक्ती विविध समाजघटकांमध्ये विधायक संवाद आणि परस्पर सहकार्याला चालना देणारी आहे.”
संघटनेच्या नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ही जबाबदारी समर्पित भावनेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक आणि वैचारिक पातळीवर विविध समाजघटकांमध्ये संवाद वाढविण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
