पाचोरा आणि चाळीसगाव येथे अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ
जळगाव : जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत सुट्या स्वरूपात विक्रीस ठेवलेले खाद्यतेल आणि मानकांनुसार नसलेल्या शीतपेयांचा तब्बल १ लाख ५५ हजार ६४० रुपयांचा साठा जप्त केला आहे. पाचोरा आणि चाळीसगाव येथे करण्यात आलेल्या या स्वतंत्र कारवायांमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कठोर करण्यात येणार असल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील वरखेडी-वाघोडे परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी रिफाइन्ड सोयाबीन तेल पॅकिंगविना आणि अन्न सुरक्षा मानक कायद्याचे उल्लंघन करून खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत तेलाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले तसेच ४४८ किलो खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. या साठ्याची किंमत ८० हजार ६४० रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी संबंधित उत्पादक आणि पुरवठादारांची चौकशी सुरू करण्यात आली असून अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, चाळीसगाव शहरात विनापरवाना शीतपेय विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘मॉन्स्टर एनर्जी’ आणि ‘झिरो एनर्जी मॉन्स्टर एनर्जी अल्ट्रा’ या कार्बोनेटेड कॅफिनयुक्त शीतपेयांचे नमुने मानकांनुसार नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. अधिकाऱ्यांनी ३५० मिलीचे ४८० कॅन आणि १२० कॅन असा एकूण ७५ हजार रुपयांचा साठा जप्त केला. संबंधित उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून विक्री परवान्यांबाबतही अनियमितता आढळल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधित पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या असून बाजारात वितरित करण्यात आलेला साठा परत मागविण्याबाबत उत्पादक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त (अन्न) एस. आर. करकाळे यांच्या देखरेखीखाली पार पडली. सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, शरद पवार आणि योगराज सूर्यवंशी यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासनाने सर्व व्यावसायिकांना खाद्यतेलाची खुल्या स्वरूपातील विक्री टाळण्याचे आवाहन केले असून ग्राहकांनीही केवळ पॅकबंद आणि मान्यताप्राप्त खाद्यपदार्थांचीच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
