प्रतिज्ञापत्रांतून उमेदवारांच्या मालमत्ता, कर्ज आणि शैक्षणिक माहिती उघड; अनिल चौधरींकडे २.२९ कोटींची मालमत्ता, दीपक धांडे सर्वात कमी मालमत्ताधारक
जळगाव : राज्यातील विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींची धावपळ सुरू असून उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून उमेदवारांच्या मालमत्ता, कर्ज, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिक स्थितीची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले असून त्यांच्या नावावर तब्बल ४ कोटी ४८ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर महाजन यांच्याकडे सुमारे २ कोटी १७ लाख रुपयांची शेतजमीन असून २ कोटी ३० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास ६५० ग्रॅम सोन्याचा साठा आहे. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र प्रतीक महाजन यांच्या नावावर अमेरिकेतील सेंटेंडर बँकेत सुमारे ३४ लाख रुपयांच्या ठेवी असल्याची नोंदही करण्यात आली आहे. महाजन यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे मालमत्तेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या नावावर २ कोटी २९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. भुसावळ शहरात त्यांची पाच व्यावसायिक दुकाने असून सुमारे ७० लाख रुपये किमतीचे घर आहे. तसेच २०.२५ लाख रुपये किमतीची स्कोडा ऑक्टाव्हिया ही आलिशान कार त्यांच्या मालकीची आहे. मात्र, त्यांच्यावर १ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात शिक्षा झाल्याचा तसेच काही गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्याकडे ४६ लाख ५२ हजार रुपयांची मालमत्ता आहे. धरणगाव तालुक्यातील शेती आणि अन्य जंगम मालमत्तेचा त्यांनी तपशील दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नसून कुटुंबावर कोणतेही बँक कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्याकडे ८९ लाख ६४ हजार रुपयांची मालमत्ता आहे. जळगाव पीपल्स बँकेत त्यांच्या नावावर ३९ लाख ५१ हजार रुपयांची मुदत ठेव असून त्या पूर्णपणे कर्जमुक्त असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
तर बंडखोर उमेदवार दीपक धांडे हे सर्वात कमी मालमत्ता असलेले उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या नावावर कोणतीही जमीन किंवा घर नसून केवळ ५० हजार रुपयांची रोकड असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कुटुंबाकडे सुमारे ७.५ लाख रुपयांचे सोने असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून समोर आलेली आर्थिक आणि वैयक्तिक माहिती मतदारांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मालमत्ता, कर्जबाजारीपणा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यांसारख्या बाबींची माहिती सार्वजनिक झाल्याने निवडणुकीच्या चर्चांना अधिकच उधाण आले असून मतदारही उमेदवारांचा बारकाईने अभ्यास करताना दिसत आहेत.
