प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांची धडक कारवाई; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृत व संशयित बनावट कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ९ लाख १५ हजार ४१६ रुपये किमतीचा बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
पोलिसांना जामनेर शहरातील साईनगर परिसरात राहणारे दीपक राजमल चौधरी यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांचा अनधिकृत साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांच्या गोण्या आणि पॅकेट्स आढळून आली.
कारवाईदरम्यान ४० गोण्या आणि १,०१६ बियाण्यांची पॅकेट्स जप्त करण्यात आली. या पॅकेट्सवर विविध कंपन्यांची नावे आणि बॅच क्रमांक नमूद करण्यात आलेले होते. मात्र तपासणीवेळी संबंधित व्यक्तीकडे बियाणे विक्रीचा वैध परवाना, साठा परवाना किंवा विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे उघड झाले. तसेच जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतेही समाधानकारक पुरावेही सादर करण्यात आले नाहीत.
पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आलेल्या सर्व बियाण्यांची एकूण किंमत ९ लाख १५ हजार ४१६ रुपये इतकी आहे. प्राथमिक तपासात संबंधित बियाणे उत्पादक कंपनीची अधिकृत परवानगी न घेता ही बियाणे बाजारात विक्रीसाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या मते, अशा प्रकारच्या अनधिकृत आणि संशयित बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी दीपक राजमल चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुलाब आधार पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा), शेषराव पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा) तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३, बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच इतर संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि परवाना तसेच बिलाची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
