दानपेटी फोडून चोरट्यांनी लंपास केली हजारो रुपयांची रक्कम; ग्रामस्थांमध्ये संताप
रोटवद । प्रतिनिधी । प्रशांत शिंदे ।
रोटवद येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करत दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री अंदाजे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान घडली असावी. चोरट्यांनी प्रथम मंदिराच्या प्रवेशद्वारावरील कुलूप जड वस्तू अथवा दगडाच्या साहाय्याने फोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील दानपेटी जागेवरून उचलून तिचे कुलूप तोडण्यात आले. दानपेटी वाकवून त्यामधील अंदाजे पाच ते सहा हजार रुपयांची रक्कम चोरून नेण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
सकाळी सेवेकऱ्यांच्या निदर्शनास आला प्रकार
सकाळी मंदिरातील सेवेकरी लोटन आण्णा पाटील व नितीन सोनार हे नियमित सेवेसाठी मंदिरात आले असता त्यांना मंदिराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. मंदिरात पाहणी केली असता दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच केंद्रातील सेवेकरी गोपी शिंदे, राज निकम आणि महारूभाऊ पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच रोटवद गावचे पोलीस पाटील नरेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली.
चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी
धार्मिक स्थळात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी होत असून संबंधित चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेबाबत पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
