आठवडाभरात दुसऱ्यांदा वादळ-पावसाचा फटका; शेतकरी पुन्हा अडचणीत, पंचनाम्यांची मागणी
भडगाव : भडगाव तालुक्यातील वाडे परिसरात रविवारी (दि. ७ जून) सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभरापूर्वीच झालेल्या नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी सावरत असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
दि. ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे परिसरातील केळी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानीची नोंद घेतली होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
केळीच्या बागा आडव्या; सोलर प्लेटचेही नुकसान
वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच शेतकरी राजू बाबुराव माळी यांच्या शेतातील सोलर प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर येत असून नुकसानीचा नेमका आकडा पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.
संकटातून सावरण्याआधीच दुसरा घाव
एकीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळामुळे सलग दुसऱ्यांदा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग घायाळ झाला आहे. अस्मानी संकटामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार शीतल सोलाट, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर आणि वाडेचे तलाठी कल्याण पाटील यांना नुकसानीची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून सोमवारी (दि. ८ जून) सकाळपासून पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
छायाचित्रे :
वाडे परिसरातील केळी पिकांचे नुकसान
वादळामुळे नुकसान झालेल्या सोलर प्लेट
छायाचित्रकार : शकील शेख, भडगाव
