खाजगी कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी; नुकसान मांडताना जवानांना अश्रू अनावर
धुळे : देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैन्यदलातील जवानांनाच खाजगी कंत्राटदाराच्या कथित निष्काळजीपणा आणि निकृष्ट बांधकामाचा फटका बसल्याची धक्कादायक घटना धुळे शहरात उघडकीस आली आहे. अवघ्या चार ते सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या दोन बंगल्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित जवानांनी केली आहे.
ही घटना धुळे शहरातील पारोळा रोड परिसरातील रामचंद्र नगर येथे घडली आहे. मूळ धुळे तालुक्यातील आंबोडे गावचे रहिवासी असलेले आणि सध्या रामचंद्र नगर येथे वास्तव्यास असलेले सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवान विनोद चिंतामण बोरसे तसेच सैन्यदलातील सेवानिवृत्त जवान कृष्णा शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या स्वप्नातील घराच्या बांधकामाची जबाबदारी फागणे येथील खाजगी कंत्राटदार महेंद्र काशिनाथ पाटील आणि अभियंता युवराज सूर्यवंशी यांच्याकडे सोपविली होती.
माहितीनुसार, कृष्णा शिंदे यांनी सुमारे १६ लाख रुपयांत एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे, तर बीएसएफ जवान विनोद बोरसे यांनी १७ लाख रुपयांत बारा शे चौरस फूट क्षेत्रफळाचे घर बांधण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडे दिले होते. यासंदर्भातील करार स्टॅम्प व नोटरीद्वारे करण्यात आला होता.
मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच ते सहा महिन्यांतच दोन्ही बंगल्यांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे जाऊ लागले. त्यामुळे संपूर्ण बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निकृष्ट साहित्य आणि दोषपूर्ण कामामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप जवानांनी केला आहे.
याबाबत संबंधित कंत्राटदाराला वारंवार माहिती देऊनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. उलट वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने न्याय मिळावा या अपेक्षेने जवानांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. झालेल्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीचा पाढा वाचताना दोन्ही जवानांना अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.
देशसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या जवानांच्या बाबतीत असा प्रकार घडणे दुर्दैवी असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार व अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी पीडित जवानांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील बांधकामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, नागरिकांनी घरबांधणी करताना संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांची विश्वासार्हता तपासूनच व्यवहार करावेत, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
