व्हायरल व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाची तातडीची कारवाई; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ताब्यात, परवाना रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस
भुसावळ (संघरत्न सपकाळे) : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाली पडलेले वडे पुन्हा उचलून प्रवाशांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर भुसावळ रेल्वे प्रशासनाने संबंधित विक्रेत्यावर तातडीने कठोर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित विक्रेत्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले आहे.
प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाने संबंधित खाद्यपदार्थ विक्री स्टॉल तात्पुरता सील केला असून, या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार मानल्या जाणाऱ्या मुख्य परवानाधारक अर्थात ठेकेदारालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा शोध
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यातून संबंधित विक्रेत्याची ओळख निश्चित करण्यात आली आणि त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) स्वाधीन करण्यात आले असून, रेल्वे कायद्यानुसार विविध कलमांखाली चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
खाद्य स्टॉल तात्पुरता बंद
प्राथमिक चौकशी सुरू असतानाच संबंधित खाद्यपदार्थ विक्री स्टॉल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत स्टॉल सील ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ठेकेदारालाही नोटीस
या प्रकरणात केवळ विक्रेत्यावरच नव्हे तर संबंधित ठेकेदारावरही जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. “परवाना का रद्द करण्यात येऊ नये?” अशी कारणे दाखवा नोटीस संबंधित ठेकेदाराला बजावण्यात आली असून, संपूर्ण घटनेबाबत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ठेकेदाराचे उत्तर समाधानकारक नसल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह आर्थिक दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड नाही
या घटनेनंतर भुसावळ रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. स्थानक परिसरातील सर्व अधिकृत स्टॉलधारकांनी स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचेही प्रशासनाने बजावले आहे.
तक्रारींसाठी ‘१३९’ हेल्पलाईनचा वापर करा
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाही आवाहन केले आहे की, स्थानक परिसरात किंवा रेल्वे गाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता किंवा अनधिकृत विक्रेते आढळल्यास तात्काळ रेल्वे हेल्पलाईन १३९ वर तक्रार नोंदवावी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा प्रकारांवर वेळीच कारवाई करून प्रवाशांच्या आरोग्याचे संरक्षण करता येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. या कारवाईनंतर भुसावळ रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्री व्यवस्थेवर अधिक कडक नजर ठेवली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाईचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
