विविध मागण्यांसाठी सरकारला इशारा; डॉ. दीपकमाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती मोहीम
धुळे (सुनील निकम) : संविधानिक हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आणि आरक्षण व्यवस्थेच्या समर्थनार्थ ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने धुळे शहरात ‘संविधान बचाव-आरक्षण बचाव’ यात्रेचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपकमाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, बौद्ध बांधव आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यात्रेत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र संयोजक माधव भालेराव, युवा विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे, अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक समतेचा संदेश पोहोचवणे हा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपकमाई केदार यांनी भारतीय संविधानाने दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायाचे प्रभावी साधन असून वंचित समाजाच्या प्रगतीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी समाजाने संघटित होऊन लोकशाही मार्गाने संघर्ष करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यात्रेदरम्यान शासनासमोर चार महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, देशातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात तसेच बुद्धगया महाविहाराचा ताबा बौद्ध समाजाकडे सोपविण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांनी संविधान, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या पदयात्रेत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपक केदार, जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, प्रवीण शिंदे, विशाल वाघ, कृष्णा पारधी, सतीश पाटील, रद्दशील सोनवणे, दीपक वाडीले, गणेश वाघ, निलेश इंदवे, अशोक करंजे, युवराज बाविस्कर, आबा अमृतसागर, बंटी मगरे, दादा सोनवणे, सम्राट देवरे, पूजाताई चव्हाण, ललिता जाधव, गौरव गवळी, यशवंत दुसाने, राहुल वाघ, नितीन म्हसदे, छोटूभाई साने, कुणाल साने, अश्फाक शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
यात्रेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. दीपकमाई केदार यांनी धुळेकर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. संविधान आणि आरक्षण बचावासाठी सुरू असलेल्या जनजागृती अभियानाला आगामी काळात अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असून राज्यभर अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
