पारोळ्यात दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण…
आधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारतीमुळे नागरिकांना अधिक गतिमान व पारदर्शक नोंदणी सेवा मिळणार – आमदार ॲड. अमोलदादा पाटील
पारोळा | प्रतिनिधी – सुरेश पाटोळे
पारोळा तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भव्य लोकार्पण करण्यात आले. तब्बल २ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीतून साकारलेली ही इमारत आधुनिक आणि नागरिकाभिमुख सुविधांनी सुसज्ज असून, यामुळे तालुक्यातील नागरिकांना नोंदणीविषयक सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि सुविधाजनक पद्धतीने मिळणार आहेत.
जमीन व्यवहार व दस्तनोंदणीसाठी नागरिकांना मोठा दिलासा
दुय्यम निबंधक कार्यालय हे जमीन-जुमला खरेदी-विक्री, दस्त नोंदणी, विविध करार आणि इतर महत्त्वाच्या नोंदणी प्रक्रियेशी संबंधित असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. नागरिकांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, कार्यालयीन कामकाजासाठी प्रशस्त जागा मिळावी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यक्षम वातावरण मिळावे, या उद्देशाने नवीन प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.
नवीन इमारतीमुळे नागरिकांच्या नोंदणीविषयक कामांना अधिक वेग मिळण्यास मदत होणार असून, शासकीय सेवा देण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र व पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

‘नागरिकांना शासनाच्या सेवा सन्मानपूर्वक मिळणे हाच विकास’
लोकार्पणप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.
“विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा भौतिक सुविधा उभारणे नव्हे, तर सामान्य नागरिकाला शासनाच्या सेवा अधिक सुलभ आणि सन्मानपूर्वक मिळणे हा देखील विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. पारोळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची ही प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी काळातही पारोळा शहरासह संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदारांच्या पाठपुराव्याला यश
या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी सातत्याने केलेले प्रयत्न, पाठपुरावा आणि नियोजनामुळे हे काम प्रत्यक्षात साकारल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रशासकीय सुविधांचे बळकटीकरण करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जळगाव सहायक निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदारजी कुलकर्णी, सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तथा प्रशासकीय अधिकारी घन्साराम राठोड, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीषभाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अतुलआण्णा पवार, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते अमृतभाऊ चौधरी, भाजपा शहराध्यक्ष तथा पारोळा विकासोचे उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी, सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.
तसेच शेतकी संघाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, माजी संचालक राजेंद्र पाटील, नगरसेवक पंकजभाऊ मराठे, नितीनभाऊ सोनार, अमोलदादा शिरोळे, छोटूभाऊ पाटील, नजीरखान बेलदार, विनोद पाटील, दगडू पवार सर, भूषण टिपरे, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांच्यासह पत्रकार, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, स्टॅम्प वेंडर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
पारोळ्याच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
पारोळा शहरात विविध पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय इमारतींच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. त्याच मालिकेत ₹२.३४ कोटींची दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज या इमारतीमुळे नागरिकांना नोंदणीसाठी अधिक चांगले वातावरण मिळणार असून, कार्यालयीन कामकाजही अधिक कार्यक्षमतेने पार पडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘सुविधांचा विस्तार आणि विकासाला नवा आकार’ या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप मिळाले असून, पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी ही इमारत आधुनिक शासकीय सेवा व्यवस्थेचा नवा अध्याय ठरणार आहे.
