पाचोऱ्यात केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ सराव स्पर्धा
जि. प. शाळांमध्ये इंग्रजी विषयावर विशेष भर; १४ केंद्रांवर ५६० विद्यार्थ्यांचा सहभाग
पाचोरा | प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयातील वाचन, आकलन आणि शब्दलेखन कौशल्य विकसित करण्यासाठी पाचोरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ सराव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गटविकास अधिकारी के. बी. अंजने आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड आणि गटसमन्वयक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी शाळास्तरावर स्पेलिंग बी सराव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे १४५ शाळांनी सहभाग नोंदविला.
१४ केंद्रांवर ५६० विद्यार्थ्यांचा सहभाग
शाळास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील १४ केंद्रांवर झालेल्या या उपक्रमात सुमारे ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा एकूण चार गटांमध्ये घेण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयातील वाचन, शब्दलेखन आणि आकलन कौशल्यात सुधारणा होण्यास मदत होईल, असे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले.
शिक्षकांचे मोलाचे योगदान
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष शिक्षिका प्रज्ञा आराध्ये, केंद्रप्रमुख अनिल पाटील, सखाराम महाजन, संदीप पवार, शांताराम वानखेडे, जितेंद्र पाटील, राजेश सोनवणे, रामदास जाधव, रामराव पाटील, संजय काळे, जावेद शेख, विशाल पवार, ज्ञानेश्वर पाचोळे, अनिल वराडे, चंद्रकांत मोराणकर, सुनील शिवदे, गिरीश भोयर, कैलास बडगुजर तसेच सर्व विशेष शिक्षकांनी परिश्रम घेतले.
अशी होते ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा
या स्पर्धेत प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून एक-एक इंग्रजी शब्द सांगितला जातो. संबंधित विद्यार्थ्याला त्या शब्दाचे अचूक स्पेलिंग सांगावे लागते. चुकीचे स्पेलिंग सांगणारा विद्यार्थी स्पर्धेतून बाद होतो. अशा पद्धतीने अंतिम फेरीपर्यंत टिकून राहणारा विद्यार्थी विजेता घोषित केला जातो.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
