दलित वस्तीतील निकृष्ट कामांविरोधात माळेगावच्या नागरिकाचा आमरण उपोषणाचा इशारा
१५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा शिवराम जाधव यांचा इशारा; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
सोयगाव | प्रतिनिधी :
सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिप्री येथील दलित वस्तीतील १५ वा वित्त आयोग तसेच इतर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत शिवराम दगडू जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शिवराम जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे की, त्यांनी १५ जानेवारी २०२६ आणि २७ जुलै २०२६ रोजी संबंधित कामांबाबत तक्रार अर्ज दिले होते. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, तसेच करण्यात आलेल्या कामांचे दिलेले पेमेंट नियमानुसार वसूल करावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. याशिवाय सरपंच साधनाबाई रविंद्र परदेशी व ग्रामसेवक पी.बी. गोरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
पूर्वीच्या उपोषणानंतरही कार्यवाही नसल्याचा आरोप
याच मागण्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कार्यवाही झालेली नसल्याचा दावा शिवराम जाधव यांनी केला आहे.
मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप
माळेगाव येथील दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता, गटार-नाली आणि नळ कनेक्शन यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातही अपेक्षित विकासकामे झालेली नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधित कामांची चौकशी करावी व दोषींवर नियमानुसार कारवाई करावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिवराम जाधव यांनी दिला आहे.
