स्वातंत्र्यदिनानिमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून ५०० झाडांचे वृक्षारोपण
पांझरा नदीकिनारी वृक्षलागवडीला सुरुवात; मनपाच्या सहकार्याने झाडांच्या संगोपनावर भर
धुळे | प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागांत सुमारे ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
या वृक्षलागवड मोहिमेस महापालिका प्रशासनाचेही सहकार्य लाभणार असून, लागवड केलेल्या झाडांना मनपाच्या माध्यमातून नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशनचे अक्षय मुंडके यांनी दिली.
आंध्र प्रदेशातून आणली बकुळीची रोपे
या मोहिमेसाठी आंध्र प्रदेशातून विशेषतः बकुळी जातीची सुमारे चार वर्षे वयाची आणि अंदाजे २५० किलो वजनाची झाडे धुळ्यात आणण्यात आली आहेत. पांझरा नदीकिनाऱ्यासह शहरातील विविध भागांत या झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेली झाडे जगविण्यासाठी त्यांचे नियमित संगोपन व पाणीपुरवठा करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास तसेच नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग
यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष भारत वाघ, संदीप सैंदाणे, अक्षय मुंडके, गोपाल शर्मा, दीपक शेलार, देवेंद्र कटारिया, संजय पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
