नशिराबादच्या ११० वर्षे जुन्या वाचनालयाचा अनोखा उपक्रम; आठवडे बाजारात भरले ग्रंथप्रेमींचे विश्व
स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व वाचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; मोबाईलपासून दूर नेत वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न
नशिराबाद | धीरज सैतवाल । प्रतिनिधी :
येथील ११० वर्षे पुरातन तालुका ‘ब’ दर्जा वाचनालयाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गावात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविला. वाचनालयाची वाचक संख्या वाढविणे, विद्यार्थी व पालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेला मोबाईलचा वापर कमी करून त्यांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने आठवडे बाजार परिसरात नवनवीन अनमोल ग्रंथांचे प्रदर्शन व वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला नशिराबाद ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके पाहण्याची आणि त्यांची माहिती घेण्याची संधी नागरिकांना मिळाली.
मोबाईलच्या वाढत्या वापराला पर्याय म्हणून पुस्तकांची ओळख
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी आणि पालकांचा मोबाईल फोनकडे वाढता कल चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची विचारशक्ती आणि ज्ञान वाढावे तसेच पुस्तकांशी नाते दृढ व्हावे, यासाठी वाचनालयाने हा उपक्रम राबविला.
नवनवीन आणि विविध विषयांवरील ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनाला भेट देत पुस्तकांची माहिती घेतली. अनेकांनी वाचनालयाचे सभासद होण्याची तयारी दर्शविल्याने या उपक्रमाचा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले.
मान्यवरांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
ग्रंथ प्रदर्शनाला नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेशजी पाटील, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रजी सोनवणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक लालचंद पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. याशिवाय विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक-शिक्षिका आणि ज्येष्ठ नागरिकांनीही प्रदर्शनाचा लाभ घेतला.
वाचनालयाच्या उपक्रमामुळे गावात वाचन चळवळीला चालना मिळेल आणि नव्या पिढीमध्ये पुस्तकांबद्दल आकर्षण निर्माण होईल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
वाचन संस्कृती जपण्याचा वाचनालयाचा संकल्प
११० वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या वाचनालयाने काळानुरूप बदल स्वीकारत वाचनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी नियमितपणे वाचनालयाचा लाभ घ्यावा आणि पुस्तकांशी आपले नाते अधिक दृढ करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पितांबर आमोदकर, कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी, सेक्रेटरी ॲड. प्रदीप मुरारी देशपांडे, तसेच संचालक मिठाराम शामराव म्हसकर, राजेश्वर सखाराम धर्माधिकारी, जितेंद्र देविदास पाटील, संजय पंडित पाटील, मनोज अरुण नाईक, बी. आर. खंडारे, प्रा. व्ही. बी. कोष्टी, ग्रंथपाल सौ. अनुराधा तारकस आणि सेवक सुधाकर महाजन यांनी परिश्रम घेतले.
नशिराबादच्या या ऐतिहासिक वाचनालयाने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले ग्रंथ प्रदर्शन आणि वाचक मेळावा हा ‘मोबाईलपासून पुस्तकांकडे’ वळण्याचा प्रेरणादायी संदेश देणारा उपक्रम ठरला.
