पारोळा नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नगरसेवक नितीन सोनार व राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण; ‘स्वच्छ, सुंदर, हरित व निरोगी पारोळ्या’साठी सहकार्याचे आवाहन
पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील :
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त पारोळा नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपरिषद कार्यालयात नगरसेवक भाऊसो. नितीन दत्तात्रय सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच पारोळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात नगरसेवक बापूसो. राजेंद्र हिम्मत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण
यावेळी उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. स्वातंत्र्याचा अमूल्य वारसा जपत देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष दादासाहेब चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी पारोळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “हरित, स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पारोळा घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, आरोग्य सभापती तथा नगरसेवक डॉ. मंगेशअण्णा तांबे, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ अनुष्ठान, नगरसेवक अमोलभाऊ शिरोळे, राजेंद्रभाऊ कासार, बापूसाहेब मिस्तरी, भावडूभाऊ राजपूत, संदेशभाऊ शिरोळे, भूषणभाऊ टिपरे, नजीर खान बेलदार, विनोद पाटील, इमरान शेख सलीम, स्वप्नील गोपाल दाणेज यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच गटनेत्या तथा नगरसेविका सौ. अलकाताई धीरज महाजन, सौ. किरण चंद्रकांत पाटील, सौ. भाग्यश्री दिपक अनुष्ठान, सौ. माधुरी पवार यांच्यासह प्रशासन अधिकारी यामिनी लक्ष्मणसा जटे, स्थापत्य अभियंता सुमित पाटील, लेखापाल दीपक महाजन, सहाय्यक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सोमा माळी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पारोळा नगरपरिषदेत झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, नागरिकांची सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छ-सुंदर शहरनिर्मितीचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
