वाघोदे बुद्रुक येथे उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा
भारतमातेच्या वीर जवानांच्या हस्ते ध्वजारोहण; सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती
वाघोदा, ता. रावेर | प्रतिनिधी : अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील वाघोदे बुद्रुक येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावचा अभिमान आणि भारताची शान असलेल्या भारतीय सैन्यातील जवान सलीम तडवी, रितेश वाघ आणि प्रमोद वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. भारतीय जवानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी सरपंच अलका बाळू महाजन यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच वाघोदे बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. जवानांच्या देशसेवेबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा गौरव केला.
