पावसाअभावी खरीप पिके धोक्यात; उशिरा पेरणीनंतर आता पावसाची ओढ लागल्याने शेतकरी चिंतेत!
जामखेड तालुक्यात सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, उडदाची पिके संकटात; ओलावा संपल्याने पिके पिवळी पडू लागली, दमदार पावसाची प्रतीक्षा
अहिल्यानगर | जिल्हा प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार
अहिल्यानगर : यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर आणि समाधानकारक न झाल्याने जामखेड तालुक्यातील खरीप हंगामावर संकटाचे ढग दाटले आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे खरिपाच्या पेरण्या तब्बल १५ ते २० दिवस उशिरा झाल्या. जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी कसाबसा पेरणीचा टप्पा पूर्ण केला. मात्र, आता पिके उगवून वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने पुन्हा मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जामखेड तालुक्यात यंदा प्रामुख्याने सोयाबीन, बाजरी, मूग, तूर आणि उडीद या खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत पेरण्या लांबल्या. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्यावर कोरडी-ओली पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने आता पिकांच्या वाढीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
पिकांची वाढ खुंटली; शेतातील ओलावा संपला
जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या अल्प पावसामुळे अनेक शेतांमध्ये पिके उगवून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने हा दिलासा अल्पकाळच टिकला. सध्या अनेक भागांतील जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, पिकांची वाढ खुंटली आहे.
कडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः सोयाबीन आणि मूग पिकांना सध्याच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची मोठी गरज आहे. मात्र, शेतातील ओलावा कमी झाल्याने पिकांची पाने पिवळी पडू लागली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दुबार पेरणीचे संकट?
पावसाची अशीच ओढ कायम राहिल्यास काही भागांत पिके वाचविणे कठीण होण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च, बियाणे, खते, मशागत आणि मजुरी यामुळे आधीच आर्थिक भार वाढला आहे. आता पिके हातातोंडाशी येण्यापूर्वीच पावसाने दगा दिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
काही भागांमध्ये पिकांची परिस्थिती गंभीर झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दमदार आणि सर्वदूर पाऊस पडणे खरीप पिकांसाठी अत्यंत आवश्यक बनले आहे.
विहिरी-कूपनलिकांच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ नाही
तालुक्यातील अनेक भागांतील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत अद्याप अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर संरक्षित सिंचन करण्याची इच्छाही अनेक शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्षात आणणे कठीण ठरत आहे.
पावसाच्या सुरुवातीच्या काळातील अनिश्चितता आणि त्यानंतर पडलेली प्रदीर्घ उघडीप यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खरीप हंगामासाठी मोठा खर्च केल्यानंतर आता पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
‘आता वरुणराजाच्या कृपेवरच खरिपाचे भवितव्य’
“जामखेड तालुक्यात अनेक भागांत पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. विहिरी आणि कूपनलिकांनाही पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे पिकांना संरक्षित सिंचन देणेही अवघड झाले आहे. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली आणि आता प्रदीर्घ उघडीप पडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता केवळ वरुणराजाच्या कृपेवरच खरिपाचे भवितव्य अवलंबून आहे,” अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा चिंतेत आहे.
