सोयगावच्या आरोग्य व पाणीपुरवठा प्रश्नांसाठी मंत्रालयात पाठपुरावा
जि.प. सदस्या पुष्पाताई काळे यांची मंत्री मेघना बोर्डीकर व आदिती तटकरे यांची भेट; विविध मागण्यांचे निवेदन सादर
मुंबई | प्रतिनिधी : सोयगाव तालुक्यातील आरोग्य आणि पाणीपुरवठ्याच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जि.प. सदस्या सौ. पुष्पाताई काळे यांनी मुंबईतील मंत्रालयात राज्याच्या ऊर्जा, आरोग्य व पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी सोयगाव तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत त्यांनी संबंधित मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले.
आरोग्य सुविधांसह पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी
सोयगाव तालुक्यातील नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत व नियमित व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तालुक्यातील विविध गावांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याची अपेक्षा पुष्पाताई काळे यांनी व्यक्त केली.
मंत्रालयातील या भेटीमुळे सोयगाव तालुक्यातील आरोग्य व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांना शासनस्तरावर चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
