‘गुणांसोबत संस्कारांचीही शिदोरी जपा; माणुसकीची मार्कशीट सर्वांत मोठी’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
गुणवंत विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप; नंदिनी-धनश्रीचा ॲक्टीव्हा देऊन गौरव, पालकमंत्र्यांच्या दातृत्वाबद्दल संस्था, पालक व विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता
धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांनी आयुष्यात केवळ गुणांच्या शर्यतीत अडकून न राहता स्वतःतील वेगळे कौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा द्यावी. चांगली मार्कशीट महत्त्वाची आहे; मात्र माणुसकीची मार्कशीट त्याहून मोठी आहे. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण आई-वडील, शिक्षक आणि समाजाबद्दलचा आदर कधीही कमी होऊ देऊ नका, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे माध्यमिक विद्यालयात आयोजित ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या’त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल भाटिया होते.
सलग दोन वर्षे तालुक्यात प्रथम क्रमांकाची परंपरा
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दहावीच्या परीक्षेत मागील वर्षी धरणगाव तालुक्यात नंदिनी राकेश पवार, तर यंदा धनश्री अनिल पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. सलग दोन वर्षे एकाच शाळेतील विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम येणे ही केवळ दोन विद्यार्थिनींची वैयक्तिक कामगिरी नसून, शाळेत निर्माण झालेल्या भक्कम शैक्षणिक संस्कृतीची पावती आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास या तिन्ही घटकांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. नंदिनी व धनश्री यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या संपूर्ण परिवाराचे त्यांनी अभिनंदन केले.
नंदिनी-धनश्रीचा ॲक्टीव्हा देऊन गौरव
मेहनतीचे कौतुक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा देते. त्यामुळे नंदिनी आणि धनश्री यांचा ॲक्टीव्हा देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांमध्येही ‘पुढील वर्षी या व्यासपीठावर माझाही सत्कार झाला पाहिजे’, अशी जिद्द निर्माण व्हावी, हा गौरवामागील उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शालेय परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
‘मोबाईलचा वापर ज्ञानासाठी करा, गुलाम बनू नका’
आज मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसमोर ज्ञानाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, सुविधा वाढल्या म्हणून यश आपोआप मिळत नाही. मोबाईलचा वापर अभ्यास, ज्ञानवृद्धी आणि प्रगतीसाठी करा; मोबाईलचा गुलाम बनू नका, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षमता असते. केवळ पहिला क्रमांक मिळवणे म्हणजेच यश नव्हे. स्वतःतील कौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा द्यावी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असा संदेशही त्यांनी दिला.
पालकमंत्र्यांच्या योगदानाबद्दल संस्थेकडून कृतज्ञता
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. बालकवी ठोंबरे शाळेच्या विकासासाठी पालकमंत्र्यांचे नेहमीच भरीव योगदान व सहकार्य लाभले आहे. शाळेच्या विविध विकासकामांना त्यांनी सातत्याने पाठबळ दिल्यामुळे शाळेच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली असून, त्यांचे योगदान संस्थेसाठी मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव लालाजी उपासनी, उपाध्यक्ष चिंतामण पाटील, संचालक प्रा. हेमंत पाटील, मुख्याध्यापक जीवन पाटील, एस. एस. पाटील, ललितजी उपासनी, शांताराम महाजन, शोभाताई चौधरी, सुशिलभाई गुजराथी, ॲड. राजेंद्र येवले, प्रदीप मालपुरे, यशवंत कुलकर्णी, मनोहर बडगुजर, ॲड. राहुल पारखे, मोहन रावतोळे, ज्ञानेश्वरजी भामरे, प्रदीप बन्हाटे यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष चिंतामण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक टी. पी. रोकडे यांनी केले, तर ॲड. राजेंद्र येवले यांनी आभार मानले.
