रोटवद येथे विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सबाबत जनजागृती; कायदेशीर हक्कांचीही दिली माहिती
ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात ICTC धरणगावच्या वतीने मार्गदर्शन; किशोरवयीन विद्यार्थ्यांना आरोग्य व समुपदेशन
रोटवद प्रतिनिधी : प्रशांत शिंदे
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘इंटेंसिफाइड कॅम्पेन 3.0’ अंतर्गत रोटवद येथील ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात एचआयव्ही/एड्स आणि लैंगिक आरोग्याबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आयसीटीसी (ICTC), ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या वतीने घेण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सची शास्त्रीय माहिती, संसर्गाचे मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय तसेच शासनाकडून उपलब्ध असलेल्या मोफत उपचार व आरोग्य सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. एचआयव्ही/एड्सबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याबरोबरच योग्य आरोग्यविषयक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कायदेशीर हक्कांबाबतही मार्गदर्शन
एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायद्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. एचआयव्ही बाधित व्यक्तींना मिळणारे कायदेशीर संरक्षण, समान वागणुकीचा अधिकार आणि गोपनीयतेचा अधिकार याबाबतही जागरूक करण्यात आले.
किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्यविषयक समुपदेशन
कार्यक्रमात किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि योग्य समुपदेशनाचे महत्त्व याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना महांत, उपमुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, श्री. पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी तसेच किशोरवयीन आरोग्याविषयी योग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
