नाहाटा महाविद्यालयात ‘जिमखाना डे’ उत्साहात साजरा
विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा गुणगौरव; सचिन जोहरे प्रथम, तुषार जोहरे द्वितीय
भुसावळ | प्रतिनिधी
नाहाटा महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ‘जिमखाना डे’ गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या क्रीडा कौशल्याचा गौरव करण्यात आला.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी टेनिस, क्रिकेट, लॉन टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब, योगविद्या आणि शरीरसौष्ठव आदी विविध क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले आहे. या खेळाडूंच्या वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ‘जिमखाना डे’च्या निमित्ताने त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
संपूर्ण शैक्षणिक वर्षातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सचिन जोहरे, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तुषार जोहरे यांना प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तेजस झोपे, रिशा चंद्रा आणि मुशरब खान यांना विभागून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे होते. विशेष उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील तसेच जिमखाना समितीचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना विभागप्रमुख डॉ. आनंद उपाध्याय यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना समिती सदस्य अख्तर खान, डॉ. पी. एच. इंगोले, डॉ. ए. जे. हिवाळे, डॉ. एस. डी. येवले, डॉ. एम. जे. जाधव, डॉ. यु. ए. फेगडे, डॉ. एच. व्ही. पाटील, डॉ. एस. आर. भिरूड, डॉ. पी. एम. महाजन, डॉ. एस. एस. कोलते तसेच क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रेरणा निर्माण झाली. महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला पुढे नेण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
