युवासेनेच्या बळकटीकरणासाठी नव्या दमाच्या युवकांना संधी : प्रतापराव पाटील
जळगाव ग्रामीणमध्ये युवासेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद; जळगाव-धरणगाव तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर
पाळधी | जळगाव ग्रामीण प्रतिनिधी :
“युवक ही संघटनेची खरी ताकद आहे. केवळ पद देणे हा उद्देश नसून काम करण्याची जिद्द, जनतेशी नाळ आणि संघटनेसाठी वेळ देण्याची तयारी असलेल्या नव्या दमाच्या युवकांना जबाबदारी देऊन पुढे आणायचे आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात युवासेनेची मजबूत फळी उभी करून गावागावात संघटन अधिक भक्कम करणार आहोत,” असे प्रतिपादन युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात युवासेनेचे संघटन अधिक व्यापक आणि मजबूत करण्याच्या उद्देशाने जळगाव व धरणगाव तालुक्यातील इच्छुक युवा पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती सोमवारी पाळधी येथे घेण्यात आल्या. या मुलाखतींना दोन्ही तालुक्यांतील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
युवकांचा सामाजिक सहभाग, जनसंपर्क जाणून घेतला
मुलाखतीदरम्यान प्रतापराव पाटील यांनी इच्छुक युवकांशी थेट संवाद साधत त्यांचा सामाजिक सहभाग, गावातील जनसंपर्क, संघटनात्मक काम करण्याची तयारी तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवरील भूमिका जाणून घेतली.
यावेळी अनेक युवकांनी सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. गावपातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी वेळ देण्याची तयारीही इच्छुकांनी दर्शविली.
नव्या पिढीला संघटनेत संधी
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना व युवासेनेचे संघटन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून नव्या युवकांना संघटनात्मक प्रवाहात आणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर युवकांचा विश्वास : प्रतापराव पाटील
“पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघातील गावागावाशी नाते जोडले आहे. युवकांशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण स्वतःहून युवासेनेत काम करण्यासाठी पुढे येत आहेत,” असे प्रतापराव पाटील यांनी सांगितले.
युवकांचा उत्साह केवळ पदापुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग सामाजिक काम आणि संघटना बळकट करण्यासाठी केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव-धरणगाव तालुका कार्यकारिणी लवकरच
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार इच्छुक युवकांमधून कार्यक्षम, सक्रिय आणि जनसंपर्क असलेल्या युवकांची निवड करण्यात येणार असून जळगाव व धरणगाव तालुक्यांची युवासेना कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती प्रतापराव पाटील यांनी दिली.
या मुलाखत प्रक्रियेस युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा यांच्यासह युवासेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
युवकांच्या उत्साहातून संघटनेला नवी ऊर्जा
मुलाखतींसाठी उपस्थित युवकांमध्ये गावपातळीवर काम करण्याची तयारी, सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग आणि युवकांचे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती दिसून आली. अनुभवी कार्यकर्त्यांसोबत नव्या पिढीला संधी देऊन संघटनेची मजबूत बांधणी करण्यावर भर राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जळगाव ग्रामीणमध्ये युवासेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी झालेल्या या मुलाखतींमुळे संघटनेच्या आगामी विस्ताराची दिशा स्पष्ट झाली असून, नव्या कार्यकारिणीकडे युवकांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
