देशमुख महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
बोलीभाषेतील सहज-सोप्या काव्यातून जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या निसर्गकन्येच्या साहित्यिक योगदानाला उजाळा
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ :
बोलीभाषेतील सहज, साध्या आणि ओघवत्या शब्दांतून मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या, निसर्गाची विविध रूपे कवितेतून साकारत शेतकरी जीवनाचे वास्तव शब्दबद्ध करणाऱ्या निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. यावेळी त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
‘बहिणाबाईंचे काव्य सर्वस्पर्शी’
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी प्रास्ताविकातून बहिणाबाईंच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला.
“कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याच्या प्रांतातील एक अनमोल काव्यलेणे आहे. त्यांच्या कवितेने मानवी जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श केला आहे. निसर्ग, पशु-पक्षी, शेतकरी जीवन, सासर-माहेर, सण-उत्सव अशा बहुविध विषयांचे दर्शन त्यांच्या काव्यातून घडते. त्यामुळे त्यांचे काव्य सर्वस्पर्शी झाले आहे,” असे डॉ. अतुल देशमुख यांनी सांगितले.
बहिणाबाईंच्या काव्यातील भावभावना आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नव्या पिढीला त्यांच्या साहित्याची ओळख करून देणे आणि त्यांच्या प्रतिभेला अभिवादन करणे ही कार्यक्रमामागील प्रमुख भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला इतिहास विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील, डॉ. डी. ए. मस्की, प्रा. आर. एम. गजभिये, प्रा. एस. सी. पाटील, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रवीण देसले, प्रा. श्रद्धा ठाकूर, प्रा. स्नेहा गायकवाड, प्रा. उज्ज्वला पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अधिकराव पाटील यांनी केले, तर प्रा. ज्योती नन्नवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर; आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ या ओळींतून संसारातील संघर्ष आणि जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात आले.
