परभणीतील ४४ हजार ७१३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा
‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’च्या दुसऱ्या यादीत ३४८.०२ कोटी रुपये जमा; दोन टप्प्यांत ५२,५८३ शेतकऱ्यांना ४०८.०६ कोटींचा लाभ
परभणी | प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’च्या माध्यमातून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील ४४ हजार ७१३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ३४८.०२ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांची यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातील एकूण १ लाख ६० हजार ७६९ शेतकरी सभासदांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणीचे २ हजार ९८५, तर राष्ट्रीयीकृत बँकांमधील १ लाख ५७ हजार ७८४ शेतकरी सभासदांचा समावेश आहे. प्राप्त यादीतील ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांना सुमारे ५८२ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
दोन टप्प्यांत ५२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
शासनाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत परभणी जिल्ह्यातील ७ हजार ८७० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ६० कोटी ४ लाख १० हजार ९६६ रुपये त्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा केले होते.
त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत ४४ हजार ७१३ शेतकऱ्यांसाठी ३४८.०२ कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत दोन टप्प्यांत एकूण ५२ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ४०८.०६ कोटी रुपये जमा झाले आहेत.
यापैकी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ९१० शेतकरी सभासदांना ४.७१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
५८ हजार १३४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण महत्त्वाचे आहे. आतापर्यंत ५८ हजार १३४ शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी ही योजना लागू केली असून, पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.
‘शेतकऱ्यांच्या कष्टाला सरकारचा भक्कम आधार’
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा वितरित केला आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देत त्यांच्या कष्टाला बळ, स्वप्नांना आधार आणि शेतीला नवसंजीवनी देण्याचा सरकारचा संकल्प कायम आहे. शेतकरी सुखी, तर महाराष्ट्र समृद्ध.”
आधार प्रमाणीकरण व फार्मर आयडी पूर्ण करण्याचे आवाहन
उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे. तसेच ज्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
