सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साडेदहा लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक
प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूची कारमधून वाहतूक; ५ लाखांची होंडा अमेझही जप्त
सावदा | प्रतिनिधी : अक्षय वाघ
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकाला सावदा पोलिसांनी रंगेहात पकडले. तांदलवाडी फाट्याजवळ केलेल्या या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सावदा पोलिसांना २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता गुप्त माहिती मिळाली की, राखाडी रंगाच्या होंडा अमेझ (एमएच-१९-सीव्ही-४४४५) कारमधून प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक तांदलवाडी फाट्याच्या मार्गाने होणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला.
रात्री ११.०४ वाजता संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याच्याकडे चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे समोर आले. दोन पंचांच्या उपस्थितीत कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली.
१० लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कारवाईत ५ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा विमल पानमसाला, पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला. तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची होंडा अमेझ कार ताब्यात घेण्यात आली. अशा प्रकारे एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भुसावळ-वरणगाव परिसरात विक्रीचा संशय
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून आणला असून तो भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ०२२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका/४६८ निलेश बाविस्कर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.
