हक्काच्या लढ्याला यशाचे फळ; ‘कृती समिती’च्या सहाही लढवय्या मित्रांची शिक्षक म्हणून निवड!
विशेष प्रतिनिधी / नागपूर :
शिक्षक भरती २०२५ – २६ मध्ये जागावाढ व्हावी यासाठी स्थापन झालेल्या ‘कृती समिती’च्या आंदोलनाला आणि अहोरात्र घेतलेल्या परिश्रमाला अखेर मोठे यश आले आहे. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या, तसेच निवेदने देऊन उपोषणाचा इशारा देणाऱ्या या समितीमधील सहा प्रमुख मित्रांची पवित्र पोर्टलच्या अंतिम निकालात शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत जागा वाढवून बेरोजगारांना न्याय मिळावा, यासाठी या तरुणांनी संघटित होऊन ‘कृती समिती’ची स्थापना केली होती. या समितीच्या माध्यमातून या सहाही मित्रांनी दिवस-रात्र एक करून संपूर्ण राज्यभरात आणि स्थानिक पातळीवर आंदोलनाचे हत्यार उपसले होते. प्रशासनाला झुकवण्यासाठी त्यांनी दिलेल्या कायदेशीर लढ्याचे आणि परिश्रमाचे कौतुक आता सर्व स्तरांतून होत आहे.
या लढवय्या मित्रांची खालील ठिकाणी झाली निवड:
सुरेश भुरे – जिल्हा परिषद, नागपूर
शंकर नागपुरे – जिल्हा परिषद, नागपूर
चंद्रकांत महाजन – जिल्हा परिषद, भंडारा
ओमप्रकाश टाकळकर – जिल्हा परिषद, भंडारा
रामकृष्ण मरगळे – स्वामी शिक्षण संस्था, कोल्हापूर
शिवाजी कदम – जिल्हा परिषद यवतमाळ
संघर्षातून यशाचा मार्ग…
“मागण्या पूर्ण न झाल्यास थेट उपोषणाला बसू”, असा आक्रमक पण सनदशीर इशारा देणाऱ्या या मित्रांनी पवित्र पोर्टलच्या निकालानंतर थेट नियुक्तीचे पत्र मिळविणार आहेत. एकत्र येऊन प्रामाणिकपणे लढा दिला तर यश नक्की मिळते, हेच या सहाही मित्रांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षक भरतीसाठी संघर्ष करणाऱ्या इतर उमेदवारांमध्येही एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. सर्व स्तरांतून या सहाही नवनियुक्त होणाऱ्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
