नरडाणा हादरले! स्टेट बँकेचे ATM चोरट्यांनी पळवले; ११ लाखांची रोकड लंपास
मध्यवर्ती बाजारपेठेत मध्यरात्री धाडसी चोरी; CCTV वर काळा स्प्रे, चारचाकीतून धुळ्याच्या दिशेने पलायन
नरडाणा : सईद खान : नरडाणा शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममधील कॅश ट्रेच थेट उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, एटीएममधील सुमारे ११ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी एटीएम परिसरातील CCTV कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एटीएममधील रोकड असलेला कॅश ट्रे घेऊन चोरटे चारचाकी वाहनातून धुळ्याच्या दिशेने पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. चोरीचे स्वरूप लक्षात घेता फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे संकलित करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात एटीएमवर झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, चोरीमध्ये नेमकी किती रक्कम लंपास झाली, चोरट्यांची संख्या किती होती आणि ते कोणत्या वाहनातून आले होते, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. CCTV फुटेज व घटनास्थळावरील इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
