भीम ज्योती बुद्ध विहारात वर्षावासाचा ३१ वा दिवस आणि श्रावण पौर्णिमा भक्तिमय वातावरणात
६७ उपासक-उपासिकांनी घेतले अष्टशील; भदंत नागवंश महाथेरो यांची धम्मदेसना
चिनावल | प्रतिनिधी :
भीम ज्योती बुद्ध विहारात २८ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षावासाचा ३१ वा दिवस आणि श्रावण पौर्णिमेचा पावन सोहळा भक्तिमय व धम्ममय वातावरणात उत्साहात पार पडला. पूजनीय भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या पावन सानिध्यात विविध धार्मिक व धम्मविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ६ वाजता सुत्तपठणानंतर उपासक-उपासिकांसाठी अष्टशील ग्रहणाचा कार्यक्रम झाला. श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने एकूण ६७ उपासक-उपासिकांनी श्रद्धेने अष्टशील ग्रहण केले. यावेळी पंचशील ध्वजारोहण सौ. सोनाली भीमराव सपकाळे यांच्या हस्ते भक्तिभावाने करण्यात आले.
सायंकाळी ७ वाजता सामूहिक परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले. धम्मश्रवणासाठी भीम ज्योती बुद्ध विहार उपासक-उपासिकांनी खचाखच भरला होता. यावेळी भदंत नागवंश महाथेरो यांनी पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्धांच्या काळातील तीन महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांवर सोप्या आणि प्रांजळ भाषेत धम्मदेसना केली.

यामध्ये भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेली पहिली धम्मसंगीती, श्रेष्ठी अनाथपिंडिक यांनी जेतवन विहारासाठी केलेले महान दान आणि अंगुलिमालाचे भगवान बुद्धांच्या करुणेमुळे झालेले हृदयपरिवर्तन व धम्मदीक्षा या विषयांचा समावेश होता. उपस्थित उपासक-उपासिकांनी ही धम्मदेसना एकाग्रतेने श्रवण केली.
कार्यक्रमाची सांगता गोड खीरदानाने करण्यात आली.
६ सप्टेंबरला महिला धम्म प्रशिक्षण शिबिर
दरम्यान, भीम ज्योती बुद्ध विहाराच्या वतीने येत्या ६ सप्टेंबर रोजी महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विहाराचे अध्यक्ष आदरणीय संजय भालेराव यांनी परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
महाप्रजापती गौतमींपासून माता रमाई आणि डॉ. सविता आंबेडकर यांच्यापर्यंत महिलांनी धम्माच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुटुंब आणि भावी पिढीवर धम्माचे संस्कार रुजविण्यासाठी महिलांनी धम्मज्ञानाने समृद्ध होणे गरजेचे असल्याचे संजय भालेराव यांनी सांगितले.
दैनंदिन जीवनातील व्यापातून वेळ काढून आत्मिक आणि धम्म प्रगतीसाठी परिसरातील अधिकाधिक उपासिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे व आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत, असे आवाहन संजय भालेराव, अध्यक्ष तसेच भीम ज्योती बुद्ध विहार समिती व उपासक-उपासिका संघ, चिनावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
