बॅनर बांधताना २१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू
धुळ्यातील स्टेशन रोडवरील मध्यरात्रीची घटना; चेतन सूर्यवंशी याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी | धुळे
धुळे : शहरातील स्टेशन रोड परिसरात कार्यक्रमाचे बॅनर बांधत असताना २१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
जुने धुळे परिसरातील चेतन गोपाल सूर्यवंशी (वय २१) हा तरुण स्टेशन रोड भागात एका कार्यक्रमाचे बॅनर बांधण्यासाठी गेला होता. बॅनर बांधण्याचे काम सुरू असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने चेतनला रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मध्यरात्री घटनास्थळी नागरिकांची गर्दी
स्टेशन रोड परिसरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बॅनर लावताना वीजवाहिन्यांपासून आवश्यक सुरक्षित अंतर आणि खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडला का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित घटनेची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.
