शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; विद्यार्थ्यांनी दिवसभर सांभाळले शालेय कामकाज
नशिराबाद : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत संपूर्ण दिवसभराचे शालेय कामकाज उत्साहात सांभाळले. इयत्ता नववी, दहावी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून आपल्या शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे कार्य केले.
या अभिनव उपक्रमात शाळेतील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून श्रुती कोष्टी, उपमुख्याध्यापक म्हणून कृतिका राऊत, तर पर्यवेक्षक म्हणून चिराग झटके यांनी जबाबदारी पार पाडली.
विद्यार्थ्यांनी मांडले शिक्षक बनण्याचे अनुभव
दिवसभर शिक्षकांची भूमिका बजावल्यानंतर विद्यार्थी-शिक्षकांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. शिक्षक म्हणून अध्यापन करताना आलेल्या अडचणी, विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची पद्धत आणि शिक्षकांची जबाबदारी याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तथा कार्याध्यक्ष योगेश पाटील होते. श्री. डी. एन. पाटील यांनी संपूर्ण दिवसभराच्या शालेय कामकाजाचे निरीक्षण करून आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे यांनी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
यावेळी शाळेचे ज्येष्ठ संचालक श्री. जनार्दन माडी, ॲड. प्रदीप देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. ए. डी. चौधरी आणि पर्यवेक्षक श्री. एस. एन. पाचपांडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार
शिक्षक दिनानिमित्त नशिराबाद शिक्षण मंडळाच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्यामुळे त्यांना शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव झाली, तसेच शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी-शिक्षिका सारंगी नारखेडे, प्रिया कोष्टी, श्रावणी राखुंडे आणि टीना धांडे यांनी केले. यज्ञेश टेमकर यांनी आभार मानले.
