शेतकरी केंद्रबिंदू मानून तलाठी कार्यालय लोकाभिमुख सेवेचे केंद्र बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील
बांभोरी बु. येथे २५ लाखांच्या नव्या तलाठी कार्यालयाचे लोकार्पण; तलाठी–शेतकरी समन्वय अधिक मजबूत करण्याचे निर्देश
पाळधी/धरणगाव/बांभोरी बु., प्रतिनिधी दि. ४ : ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा महसूल प्रशासनाशी सर्वाधिक जवळचा संबंध तलाठ्याच्या माध्यमातून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून तलाठी कार्यालयातून महसूलविषयक सेवा तत्पर, पारदर्शक आणि नियमानुसार मिळाल्या पाहिजेत. तलाठी आणि शेतकरी यांच्यात नियमित संवाद व समन्वय ठेवून शेतकऱ्यांच्या महसूलविषयक अडचणी वेळेत मार्गी लावाव्यात. तलाठी आणि ग्रामसेवक ही पदे केवळ शासकीय नोकरी म्हणून न पाहता गावाची व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची मोठी संधी म्हणून पाहावीत. प्रामाणिकपणे व मनोभावे काम करून जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळवावा, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

बांभोरी बु. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २५ लाख रुपये खर्चाच्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नवीन तलाठी कार्यालयामुळे महसूल प्रशासनाच्या कामकाजासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळाला पाहिजे. तलाठी व ग्रामसेवक हे गाव पातळीवरील प्रशासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचे दुवे असून त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत सेवाभावाने आपली जबाबदारी पार पाडावी. बांभोरी बु. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. गावासाठी नवीन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करण्यात आले असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गावातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी अनेक विद्युत वितरण रोहित्रे (डीपी) मंजूर करण्यात आली असून पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक डीपी मंजूर करण्यासाठीही कार्यवाही करण्यात येईल. गावातील विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, बांभोरी बु. येथील नव्या तलाठी कार्यालयामुळे शेतकरी व नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. धरणगाव तालुक्यात महसूल प्रशासनाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी ३६ तलाठी कार्यालयांच्या इमारतींसह ६ मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. याबद्दल त्यांनी पालकमंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उजळगाव मारुती मंदिर परिसरातील १० लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक कामाचे तसेच साई सिटीमधील २० लाख रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मंडळ अधिकारी ज्योती चौधरी, ग्राम महसूल अधिकारी ज्योती लोखंडे, पोलीस पाटील ईश्वर साबळे, माजी सरपंच सुभाष पाटील, मार्केट कमिटीचे सभापती प्रेमराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत पाटील, सरपंच कमलाबाई बिल, उपसरपंच अनिता माळी, ग्रामपंचायत सदस्य नरेश पाटील, पूनम पाटील, माजी सरपंच प्रमोद जगताप, संजय पाटील, सजन पाटील, शाखाप्रमुख रामकृष्ण पाटील, दीपक भदाणे, प्रवीण मिस्त्री, प्रभाकर पाटील, भैया मराठे सर, न.पा.चे गट नेते विलास महाजन, नगरसेवक बुट्या पाटील यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी सरपंच सुभाष पाटील यांनी आभार मानले.
