स्वरांजलीतून लक्ष्मीकांतजींच्या स्मृतींना सुरेल अभिवादन
गझल, बासरी, नाट्यगीत आणि भक्तिगीतांनी रंगली अविस्मरणीय मैफल; स्व. सचिन कासार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धरणगाव प्रतिनिधी – वाल्मिक पाटील
धरणगाव : संगीत हे माणसाच्या मनाला आणि भावनांना जोडणारे प्रभावी माध्यम असून, सुख-दुःखाच्या प्रसंगी संगीत अंत:करणाला आधार देते. सुखी व आनंदी जीवनासाठी संगीताची साथ अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले.
श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व डेडीया सर शिष्य परिवारातर्फे आयोजित स्व. लक्ष्मीकांतजी डेडीया चतुर्थ संगीत महोत्सवात उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक जीवनसिंह बयस होते, तर कांतीशेठ डेडीया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्व. लक्ष्मीकांतजी डेडीया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन यांनी प्रास्ताविक केले. सौ. आरती जैन यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.
यावेळी कार्यक्रमाध्यक्ष जीवनसिंह बयस यांचा डॉ. मिलिंद डहाळे यांनी, उद्घाटक डॉ. मिलिंद बागुल यांचा राहुल जैन यांनी, तर प्रमुख अतिथी कांतीशेठ डेडीया यांचा प्रा. बी. एन. चौधरी व प्रमोद जगताप यांनी सत्कार केला.
गझलच्या सुरांनी रंगली मैफल
महोत्सवातील सांगीतिक कार्यक्रमाने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मुंबईचे प्रसिद्ध गझल गायक सुरजप्रकाश सिंग यांनी ‘फिर छिडी रात’, ‘रंजिश ही सही’, ‘यूँ ही बेसबब’, ‘हे तुझे या आसवांना’ यांसह जगजीतसिंह यांच्या लोकप्रिय गझलांची सुरेल लडी सादर करून रसिकांची मने जिंकली.
खान्देशचे सुपुत्र व पं. विवेक सोनार यांचे शिष्य असलेले प्रसिद्ध बासरीवादक योगेश पाटील व त्यांच्या शिष्यवृंदाने अप्रतिम बासरीवादन सादर केले. प्रशांत कुलकर्णी, परमानंद दीदी, गोपाल बडगुजर, निलेश राजपूत आणि घनश्याम माळी यांनीही बासरीच्या सुरांनी वातावरण सुरमयी केले.
नाना पवार, प्रदीप झुंझाराराव, राजेश डहाळे आणि तनय डहाळे यांनी नाट्यगीत, भक्तिगीत, भावगीत तसेच कव्वाली सादर करून रसिकांची दाद मिळवली. गझल गायनाला पियुष डहाळे, तर बासरीवादनाला तुषार पुराणिक यांनी तबल्याची सुरेख साथ दिली.
स्व. सचिन कासार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
स्वरांजली महोत्सवात नेहमी उत्स्फूर्त सहभाग घेणारे तसेच उत्तम गायक म्हणून परिचित असलेले स्व. सचिन कासार यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सादर झालेल्या सुरेल कार्यक्रमामुळे वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी तनय डहाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी तसेच डेडीया सर शिष्य परिवाराने परिश्रम घेतले.
