नशिराबाद शहराचे ‘अण्णा नगर’ नामांतर करा
रोहित चौधरी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; जनभावनेला कायदेशीर ओळख देण्याची मागणी
नशिराबाद (प्रतिनिधी) : नशिराबाद शहराचे अधिकृत नामांतर परमपूज्य संत श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या नावावरून ‘अण्णा नगर’ करण्यात यावे, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक रोहित बाळू चौधरी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी नशिराबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संत श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या स्मृती व कार्याला कायमस्वरूपी सन्मान मिळावा आणि नशिराबाद शहराला स्वतंत्र सामाजिक व सांस्कृतिक ओळख प्राप्त व्हावी, यासाठी शहराचे नामांतर ‘अण्णा नगर’ करण्यात यावे.
‘अण्णा नगर’ नावाला जनमान्यता मिळाल्याचा दावा
शहरातील विविध धार्मिक, सामाजिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांकडून ‘अण्णा नगर’ हे नाव मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या जनभावनेचा विचार करून नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत ठराव करून नामांतराबाबतचा आवश्यक कायदेशीर प्रस्ताव सक्षम शासन प्राधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोणत्याही पक्षाविरोधातील मागणी नसल्याचे स्पष्ट
ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासोबत संत श्री झिपरू अण्णा महाराज यांच्या स्मृतीला सन्मान देण्याच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे रोहित चौधरी यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
नामांतरासाठी स्वाक्षरी मोहीम राबविणार
सध्या हे निवेदन एकट्याने देण्यात आले असले तरी आगामी काळात या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“अण्णांचे नाव जनतेच्या मनात आहे; आता त्या भावनांना कायदेशीर ओळख मिळावी!” अशी भूमिका रोहित चौधरी यांनी मांडली आहे. निवेदनावर नगर परिषद प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून त्याबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
