बिबट्याच्या हल्ल्याबाबत चुकीची माहिती पसरवू नका
वन विभागाचे नागरिकांना आवाहन; अप्रमाणित फोटो, व्हिडिओ व संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
पाचोरा प्रतिनिधी : भुवनेश दुसाने
पाचोरा व परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांबाबत चुकीची व अप्रमाणित माहिती सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी इतर हिंस्र प्राणी तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे झालेली पशुधन हानीदेखील बिबट्याच्या हल्ल्याशी जोडून माहिती प्रसारित केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असून, अशा प्रकारची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
पशुधनावर झालेला हल्ला बिबट्यामुळेच झाला आहे, असा निष्कर्ष केवळ घटनास्थळी पाहणी, उपलब्ध पुरावे आणि वन विभागाच्या अधिकृत तपासणीनंतरच काढण्यात येतो. त्यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर तिची खात्री न करता ती बिबट्याच्या हल्ल्याची असल्याचे सांगणे अथवा सोशल मीडिया व इतर माध्यमांतून प्रसारित करणे टाळावे, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना पशुधन हानीची घटना निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ संबंधित वन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पुरावे तपासल्यानंतरच घटनेचे नेमके कारण निश्चित करण्यात येईल.
तसेच नागरिकांनी अफवा, अप्रमाणित संदेश, फोटो किंवा व्हिडिओ यांच्या आधारे कोणतेही निष्कर्ष काढू नयेत आणि अशा माहितीचा प्रसारही करू नये. बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी थेट वन विभागाशी संपर्क साधावा.
वन विभागाकडून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांसह वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या परिस्थितीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
— वन विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पाचोरा
दिनांक : ७ सप्टेंबर २०२६
