सातपुड्याच्या जंगलात अडावद पोलिसांची धडक कारवाई; गांजाची १७५ झाडे जप्त
सोयाबीन-तुरीच्या आड सुरू होती अवैध लागवड; १ किलो ३१० ग्रॅम गांजा जप्त, मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत
प्रतिनिधी हर्षल पाटील | चोपडा / अडावद
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला अडावद पोलिसांनी मोठे यश मिळवून दिले आहे. सातपुड्याच्या जंगलातील देवगड शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात सुरू असलेली अवैध गांजाची शेती पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईत ओल्या हिरव्या गांजाची तब्बल १७५ लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन १ किलो ३१० ग्रॅम आहे. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत २६ हजार २०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात “ड्रग्स फ्री जळगाव” आणि “नशामुक्त भारत” अभियानांतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री, सेवन तसेच अवैध लागवडीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांना देवगड शिवारातील वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १६९ मध्ये बेकायदेशीर गांजाची लागवड होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पाहणीत सोयाबीन आणि तुरीच्या पिकाच्या आड लपवून गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची १७५ झाडे जप्त केली.
मध्य प्रदेशातील आरोपी अटकेत
या कारवाईत पोलिसांनी देवसिंह रावल्या बारेला (वय ४४) याला घटनास्थळावरून अटक केली. आरोपी हा मूळचा सोनखेडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश येथील रहिवासी असून, सध्या अनेर नदीच्या काठावरील झोपडी, देवगड शिवार, ता. चोपडा येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७८/२०२६ अन्वये NDPS Act, १९८५ मधील कलम २(b), ८(b) व २०(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत.
पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सपोनि प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड पोउपनि जितेंद्र सोनवणे, सफौ नासिर तडवी, पोहेकॉ विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, भारत नाईक, किरण शिरसाठ, पोकॉ भूषण चव्हाण तसेच मपोकॉ दिव्या मराठे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
