साळवा फाट्यावर बसथांबा पूर्ववत करा; अन्यथा शिवसेनेचा रास्तारोकोचा इशारा
तीन महिन्यांपासून एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; संतप्त विद्यार्थ्यांची निदर्शने
धरणगाव | प्रतिनिधी वाल्मिक पाटील : साळवा फाटा येथे गेल्या तीन महिन्यांपासून एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी साळवा फाट्यावर निदर्शने केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनातून एसटी प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
साळवा, साकरे, निशाणे आणि गोंदेगाव परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज चोपडा, धरणगाव आणि जळगाव येथे ये-जा करतात. मात्र साळवा फाट्यावर बसथांबा बंद असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले आहे. परिणामी त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
वारंवार मागणी करूनही समस्या कायम
साळवा फाट्यावर एसटी बसेस थांबविण्याची व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून आणि स्थानिकांकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही समस्या कायम असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
एसटी प्रशासनाने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन साळवा फाट्यावर तातडीने बसथांबा पूर्ववत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मागणी मान्य न झाल्यास रास्तारोको
बससेवा पूर्ववत न केल्यास विद्यार्थी आणि शिवसेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी यावेळी दिला.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा आणि शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने एसटी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थी व पालकांचा मोठा सहभाग
या आंदोलनात पालकांसह अर्चिता पाटील, दीक्षा भिल, दुर्गेश्वरी पाटील, धनश्री पाटील, दिव्या पाटील, हर्षदा पाटील, गौरव पाटील, हेमेश पाटील, कपिल पाटील यांच्यासह परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
