पाळधी-तरसोद बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
भीषण अपघातात मोटारसायकलसह कंटेनरखाली दबला; प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली तत्पर मदत
पाळधी (प्रतिनिधी) : पाळधी-तरसोद बायपास रस्त्यावर टाहाकळी फाट्याजवळ वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा वळणावर ताबा सुटून तो पलटी झाल्याची भीषण घटना घडली. या अपघातात बाजूने मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोनगाव बुद्रुक येथील करण जनार्दन सोनवणे (वय २०) या शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा कंटेनरखाली दबून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने दोनगाव बुद्रुकसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक सीजी ०४ एनएस ७४५५ हा पाळधी-तरसोद बायपास मार्गावरून जात असताना टाहाकळी फाट्याजवळ वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर भीषणरीत्या पलटी झाला. त्याचवेळी बाजूने मोटारसायकलवरून जाणारे करण सोनवणे हे मोटारसायकलसह कंटेनरखाली दबले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रतापराव व विक्रम पाटील यांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अपघाताचे हृदयद्रावक दृश्य पाहूनही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने मदतकार्य सुरू केले. स्वतः उपस्थित राहून रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली तसेच पुढील आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला.
बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि वाहनचालकांसाठी आवश्यक मार्गदर्शन याबाबत अधिक प्रभावी व्यवस्था असणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
बायपासचे काम तातडीने पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चौपदरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. महामार्गावरील अपूर्ण काम व वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, अपघाताच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेने रस्त्याच्या सुरक्षेचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद करण्यात आली असून अपघात नेमका कशामुळे घडला, याचा पुढील तपास सुरू आहे.
करण सोनवणे यांच्या आकस्मिक मृत्यूने दोनगाव बुद्रुक गावावर आणि कोळी समाजावर शोककळा पसरली आहे. शिक्षण घेत असलेल्या तरुणाच्या दुर्दैवी निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
