कासोदा येथे नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; अनेक दशकांची मागणी अखेर मार्गी, समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण
पारोळा/सुरेश पाटोळे | प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सामाजिक, सांस्कृतिक व सामूहिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी नाभिक समाजाकडून अनेक दशकांपासून करण्यात येत असलेली मागणी अखेर मार्गी लागल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नाभिक समाजाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे, बैठका, युवक व महिला उपक्रम तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन समाजाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या मागणीला मूर्त स्वरूप मिळाले असून, सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ झाल्याने समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

यावेळी बोलताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात समान संधी मिळणे आवश्यक आहे. कोणताही समाज विकासापासून वंचित राहू नये, ही आपली भूमिका असून, स्थानिक गरजा व सामाजिक मागण्यांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. हे सामाजिक सभागृह केवळ एक वास्तू न राहता समाजाच्या एकजुटीचे, सामाजिक उपक्रमांचे आणि पुढील पिढीच्या विकासाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या वाटचालीत आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या प्रयत्नातून विविध समाजघटकांच्या मूलभूत व सामाजिक गरजा लक्षात घेऊन अनेक विकासकामांना चालना मिळाली. सामाजिक सभागृहे, दफनभूमी व स्मशानभूमींच्या सुधारणा तसेच विविध समाजोपयोगी सुविधांच्या निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
याच सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेत आमदार ॲड. अमोलदादा पाटील मतदारसंघातील विविध समाजघटकांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहत असून, त्या शासनदरबारी मांडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कासोदा येथील नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाचे काम हे त्याच विकासदृष्टीचे उदाहरण असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.
भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नाभिक समाजाच्या वतीने आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे आभार मानण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास जात असल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, शिवसेनेचे एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, पंचायत समितीचे माजी सभापती गबाजीअण्णा पाटील, युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील यांच्यासह नाभिक समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कासोदा येथील या सामाजिक सभागृहामुळे नाभिक समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, समाजाची एकजूट आणि विविध सामाजिक उपक्रमांना निश्चितच बळ मिळणार आहे.




