उत्सवाच्या खर्चातून पाळधीत साकारतोय ‘ऑक्सिजन पार्क’!
गणपती-नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा; कायमस्वरूपी बगीच्याच्या माध्यमातून गावाला हिरवाईची भेट — पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी खु., जळगाव | दि. १४ सप्टेंबर

उत्सवाचा आनंद काही दिवसांचा असतो; मात्र त्याच उत्सवाच्या खर्चातून उभी राहिलेली सामाजिक सुविधा अनेक वर्षे समाजाच्या उपयोगी पडते. गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्या निधीतून पाळधी खुर्द येथे आकर्षक बगीचा आणि पर्यावरणपूरक ‘ऑक्सिजन पार्क’ उभारण्याचा GPS मित्र परिवाराचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पाळधी खुर्द येथे बहिणाबाई मार्टजवळ, स्मशानभूमीच्या पुढील परिसरात उभारण्यात येणाऱ्या या बगीच्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. पालकमंत्र्यांच्या सूचनेतून तसेच युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संकल्पना आणि प्रयत्नांतून GPS मित्र परिवाराने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.


‘रोषणाईपेक्षा कायमस्वरूपी सुविधा महत्त्वाची’
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “उत्सवातील दोन-चार दिवसांच्या रोषणाईपेक्षा त्याच खर्चातून गावासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण झाली, तर उत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक अधिष्ठान मिळते. GPS परिवाराने सेवा केवळ घोषणांमध्ये न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे.”
या बगीच्यात पर्यावरणपूरक ऑक्सिजन पार्क, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी फेरफटका व विरंगुळ्याची सुविधा तसेच महिला आणि नागरिकांना प्रसन्न व आरोग्यदायी वातावरणात वेळ घालवता यावा, यासाठी विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
“आज आपण केवळ सौंदर्यीकरण करत नाही, तर पुढच्या पिढीसाठी आनंदाची, आरोग्याची आणि मोकळ्या श्वासाची जागा निर्माण करत आहोत. उत्सवाच्या खर्चाला विधायक दिशा देऊन समाजासाठी कायमस्वरूपी मालमत्ता उभी करण्याचा GPS परिवाराचा विचार कौतुकास्पद आहे,” असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

आरोग्याच्या दृष्टीने फॉगिंग मशीनचीही भेट
याच कार्यक्रमात पाळधीकरांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फॉगिंग मशीन उपलब्ध करून दिले. डासजन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी गावात नियमित फवारणीसाठी या मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे.
‘गरज ओळखा आणि कृती करा’ ही GPS परिवाराची ओळख
GPS मित्र परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांचा गौरव करताना पालकमंत्री म्हणाले की, समाजातील समस्या सांगणारे अनेक असतात; मात्र त्या समस्यांवर प्रत्यक्ष उपाय उभा करणारे हात महत्त्वाचे असतात. GPS परिवाराने ही भूमिका सातत्याने निभावली आहे.
जलसंधारण व नदी-नाला खोलीकरण, फिरत्या नेत्रसेवेद्वारे तपासणी व उपचार, वारकरी सेवा, पूरग्रस्त कुटुंबांना मदत तसेच निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणासाठी आधार अशा विविध उपक्रमांतून GPS परिवाराने सेवाभावाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
याच सेवाभावी वाटचालीत आता उत्सवाच्या खर्चातून बगीचा आणि ऑक्सिजन पार्क उभारण्याचा उपक्रम आणखी एक नावीन्यपूर्ण पर्व ठरणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी नमूद केले.
प्रतापराव पाटील यांनी मांडली बगीच्याची संकल्पना
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS मित्र परिवारामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन तो निधी गावासाठी कायमस्वरूपी उपयोगी ठरणाऱ्या कामासाठी वापरण्याची संकल्पना कशी पुढे आली, बगीच्याची रचना, प्रस्तावित ऑक्सिजन पार्क, नागरिकांना होणारा उपयोग आणि भविष्यातील देखभाल याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या भूमिपूजन सोहळ्यास उद्योगपती शरद कासट, उद्योगपती सुनील झंवर, सिद्धिविनायक महागणपतीचे चेअरमन श्रीकांतजी मणियार, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, पाळधी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजू बापू, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, माजी उपसभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप पाटील, उद्योजक दिलीप पाटील, अनिल कासट, श्रीकृष्ण साळुंखे, अलीम देशमुख, गोपाल सोनवणे, उपसरपंच अकबर खान, सावकार पठाण, सनवर सेठ, चंदू माळी, राजू भाट, माजी सभापती संजय रामदास पाटील, आरिफ देशपांडे, हारून बागवान, नाना पाटील सर यांच्यासह GPS मित्र परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण माळी यांनी केले, तर आभार प्रशांत झंवर यांनी मानले.




