रामदेव बाबा जयंतीनिमित्त तार गल्लीतील मंदिरात भाविकांची गर्दी
पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी घेतला लाभ
धुळे : रामदेव बाबा जयंतीनिमित्त धुळे शहरातील तार गल्ली परिसरातील रामदेव बाबा मंदिरात दिवसभर धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जयंतीनिमित्त सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारच्या सुमारास मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तार गल्लीतील रामदेव बाबा मंदिराला जुनी धार्मिक परंपरा लाभली आहे. दरवर्षी रामदेव बाबा जयंतीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.

जयंतीनिमित्त रामदेव बाबांना दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती पार पडली. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भजन संध्येद्वारे भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले.
पहाटेपासून सायंकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदेव बाबा मंदिराचे सुरेश जैन यांनी दिली. जयंतीनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी रामदेव बाबा मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी तथा माजी नगरसेवक सुरेश जैन, मंदिराचे अध्यक्ष कैलास अग्रवाल, चंद्रकांत जैन, राजेंद्र शर्मा, गोविंद अग्रवाल, कैलास महाले, भूषण जाजू यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
