भारतीय बौद्ध महासभेच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी संतोष मोरे
शहराध्यक्षपदी अनिल सदाफुले; तालुका व शहर कार्यकारिणीचे पुनर्गठन
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : भारतीय बौद्ध महासभा शाखा जामखेड तालुका कार्यकारिणीच्या पुनर्गठनासाठी आयोजित महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड शहरातील सदाफुले जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संतोष मोरे यांची जामखेड तालुका अध्यक्षपदी, तर अनिल सदाफुले यांची जामखेड शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तालुका कार्यकारिणीत सरचिटणीसपदी बाळासाहेब ससाने आणि कोषाध्यक्षपदी राजेंद्र धनवे यांची निवड झाली. तसेच शहर कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अशोक घोडेस्वार आणि कोषाध्यक्षपदी जालिंदर यादव यांची निवड करण्यात आली.
बैठकीस महासभेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी सदस्य, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक व शिक्षिका, समता सैनिक दलाचे सैनिक तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मप्रचाराला गती देण्याचा संकल्प
संघटनेची कार्यक्षमता वाढविणे, धम्म प्रचार-प्रसार अधिक गतिमान करणे तसेच तळागाळातील समाजापर्यंत बौद्ध धम्माचे विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ, कोषाध्यक्ष विजय हूसळे, प्रचार व पर्यटन विभागाचे प्रमुख पंडित मोरे, कार्यालयीन सचिव गौतम पाचरणे, संरक्षण विभागाचे सचिव तथा समता सैनिक किशोर कांबळे, महिला जिल्हा सरचिटणीस सुरेखाताई सदाफुले, महिला जिल्हा संघटक उषाताई मोरे, अरुणाताई सदाफुले तसेच महिला तालुका अध्यक्ष अर्चना थोरात उपस्थित होत्या.
याशिवाय अरणगाव, खर्डा, वाघा, डोणगाव, घोडेगाव, नान्नज, पाटोदा तसेच जामखेड शहरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर त्रिसरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित मोरे यांनी केले, तर दीपक तुपेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
