कुस्ती स्पर्धेत संजना मोरेचे दैदिप्यमान यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ४६ किलो वजन गटात पटकावले विजेतेपद; चोरवडसह पारोळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील :
येवला, जि. नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, टेहू संचलित श्री दत्त माध्यमिक विद्यालय, चोरवड येथील विद्यार्थिनी कु. संजना विजय मोरे हिने १४ वर्षांखालील ४६ किलो वजन गटात दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर संजनाची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संजना हिने विभागीय स्तरावर आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. तिच्या या यशामुळे चोरवड गावासह पारोळा तालुक्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने कुस्तीच्या मैदानात मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
संजना मोरे हिला प्रमोद पाटील (भोंडण) तसेच विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. उमेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संजनाला सातत्यपूर्ण सराव आणि योग्य प्रशिक्षण मिळाले.
संजना हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार काकासाहेब वसंतरावजी मोरे, सचिव पराग दादा मोरे, पारोळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. रोहन दादा मोरे, गटशिक्षणाधिकारी चौधरी मॅडम, माजी गटशिक्षणाधिकारी नानासो विश्वासराव पाटील, मुख्याध्यापक श्री. विनोद पाटील, पारोळा तालुका क्रीडा समन्वयक श्री. संदीप पवार, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
राज्यस्तरीय स्पर्धेतही संजनाने उत्कृष्ट कामगिरी करून चोरवड आणि पारोळा तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिला सर्व स्तरांतून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
